आ. डॉ. परिणय फुके यांच्या मागणीला मोठे यश
*मोहाडी व तुमसरसह भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाची शासनाकडून दखल
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी आ. डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केलेल्या मागणीला यश मिळाले आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असताना सुरुवातीला दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश न झालेल्या भागांचा प्रश्न डॉ. फुके यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. या मागणीची शासनाने दखल घेतली असून, महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखांदूर, मोहाडी आणि तुमसर या पाच तालुक्यांच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
खरीप हंगामात पावसाचे असमान वितरण, पावसातील दीर्घ खंड आणि धानपिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले होते. अनेक भागांत पावसाचे प्रमाण समाधानकारक दिसत असले, तरी प्रत्यक्षात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे केवळ पर्जन्यमानाचा आकडेवारीवर आधारित निर्णय न घेता प्रत्यक्ष पीक नुकसानाची विचार करून दुष्काळग्रस्त तालुक्यांचा समावेश करावा, अशी मागणी डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
मोहाडी तालुक्यात सुमारे ८१ टक्के, तर तुमसर तालुक्यात सुमारे ७२ टक्के पर्जन्यमान झाले असले, तरी पावसातील खंडामुळे धानपिकांच्या वाढीवर परिणाम झाला होता. त्याचच तुडतुडा आणि करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. अशा परिस्थितीत पर्जन्यमानाची सरासरी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका डॉ. फुके यांनी मांडली होती. मोहाडी, तुमसर, लाखनी आणि साकोली या तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली होती.
या संदर्भात डॉ. फुके यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि शेतकऱ्यांच्या अडचणीची सविस्तर माहिती दिली. पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती, रोगराई आणि प्रत्यक्ष शेतीतील नुकसान यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली होती. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासनानुसार, खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानाची तूट आणि अन्य संबंधित घटकांमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या राज्यातील ३०४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाच्या परिषिष्ट भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखांदूर, मोहाडी आणि तुमसर या पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे संबंधित तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या वीजबीजात सवलत आणि शैक्षणिक शुल्कासंबंधी निर्धारीत सवलती यांसारख्या उपाययोजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सवलतींचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागांकडून शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी शासनपरपर्यंत पोहोचवून त्यांना आवश्यक मदत मिळावी, यासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेल्या पाठपुराव्याला या निर्णयामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेल्या मागणीची शासनाने दखल घेतल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








