जिल्ह्यातील ४ तालुके दुष्काळ यादीत घ्या, बोनस तातडीने द्या माजी चरण वाघमारे यांची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश असला तरी तुमसर, मोहाडी, लाखनी आणि साकोली या चार तालुक्यांना वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांनी शासन निर्णयाच्या प्रतीची होली करून आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
गेल्या तीन-चार दिवसांपासून पक्षाच्या वतीने तुमसर आणि मोहाडी तालुक्यात प्रत्यक्ष बांधावर जाऊन धान पिकांची पाहणी करण्यात आली. शासनाच्या कागदावरील आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. धान पिकांचे नुकसान, पाणी टंचाई आणि मदत न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वगळलेल्या भागाचा दौरा केला असला तरी आता केवळ पाहणी नको तर ठोस पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांकडे निर्णय घ्यावा, अशी मागणी वाघमारे यांनी केली.
त्यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या – १) धान बोनस तातडीने खात्यात जमा करावा, २) तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोलीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, ३) दुष्काळ निकषांचा फेरआढावा घेऊन प्रत्यक्ष बांधावरील परिस्थितीवर मदत द्यावी.
आता घोषणांची नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणीची गरज असून सरकारने जागे होऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे वाघमारे म्हणाले.
पद्मविभूषण शरद पवार यांनी मांडलेल्या १७ मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा
शरद पवार यांनी वंचित तालुके दुष्काळग्रस्त घोषित करणे, संपूर्ण जमीन महसूल माफी, शेती व शेतीपूरक कर्जाची संपूर्ण कर्जमाफी, कृषी पंपांची वीज बिले माफी व वीज खंडित न करणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक व वसतिगृह फी माफी, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करणे, पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे अधिकार तहसीलदारांना देणे, शेतकरी व शेतमजुरांना प्रति कुटुंब २५ किलो मोफत धान्य, पशुधनासाठी थेट अनुदान, जलसंधारणाची कामे सुरू करणे, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख व शेतमजुरांना २५ हजारांची थेट मदत, पीक नुकसानाची भरपाई, फळबागांना टँकरने पाणी, प्रलंबित योजनांची देयके अदा करणे, दुष्काळ निवारणासाठी संपूर्ण निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करणे आणि तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून दसरा-दिवाळीपूर्वी मदत वाटप करणे आदी १७ मागण्या केल्या आहेत. त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असेही चरण वाघमारे म्हणाले.








