भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण व शाश्वत विकासाचा संकल्प – राज्यमंत्री माधुरी मिसळ

स्वातंत्र्य दिनी उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा:- भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्यमंत्री माधुरी मिसळ बोलत होत्या. भंडारा जिल्ह्याने ग्रामविकास, पर्यावरण, कृषी, मत्स्यव्यवसाय, शिक्षण, रोजगार व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा मधुरा मदनकर, जिल्हाधिकारी सावन कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत ईटगावने दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तिकरण पुरस्कारात ‘बालस्नेही पंचायत’ राष्ट्रीय पुरस्कारात देशात प्रथम क्रमांक मिळवून १ कोटी रुपये व सन्मानचिन्ह पटकावले. साकोलीच्या खैरी/वलमाझरी ग्रामपंचायतीने ‘क्लायमेट अॅक्शन स्पेशल पंचायत अंवार्ड’मध्ये ९९.५ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मिसळ म्हणाल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ११ हजार ६९६ शेतकऱ्यांच्या खात्यात ७५.२५ कोटी रुपये जमा झाले. २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये १ लाख १४ हजार ५९४ शेतकऱ्यांना ३८० कोटींचे वीज बिल अनुदान देण्यात आले. खरीप २०२५-२६ मध्ये २५४ केंद्रावर २ हजार ३६९ रु. प्रति क्विंटल দराने धान खरेदी करून ८९ हजार शेतकऱ्यांना ७५८ कोटी रुपये देण्यात आले.

जिल्ह्यातील १७ हजार ३६३ हेक्टर जलक्षेत्रात १३९ संस्थांच्या ११ हजार ५०० सभासदांना मत्स्य व्यवसायाचा लाभ मिळत आहे. पीएम मत्स्यसंपदा योजनेत ९८ प्रस्तावांना १.१० कोटी अनुदान वाटप झाले. पंडित दीनदयाल रोजगार मेळावे व आयआयएम नागपूरच्या सहकार्याने बिजनेस फॅसिलिटी सेंटर उभारले जात आहे. ४१ गुणवंत विद्यार्थ्यांना इस्रो, बंगळुरू अभ्यास दौऱ्याची संधी मिळाली. करवती टसर सिल्कला जागतिक ओळख व युनेस्को अमूर्त वारसा यादीत स्थानासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा ग्रंथालय बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून ३ कोटी मंजूर झाले आहेत. सूत्रसंचालन मुकुंद ठवकर व मंजुषा लोढासे यांनी केले.

गौरव सोहळा

युवा पुरस्कार २०२६ मध्ये समाजहितासाठी दिपाली मते (तुमसर), जोसेफ वाढई (लाखांदूर) व १०० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे प्रीतम राजाभोज यांचा सन्मान करण्यात आला. पर्यटनावर उत्कृष्ट कॉफी टेबल बुक तयार केल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांडले यांना प्रमाणपत्र देण्यात आले. पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, गोकुळ सूर्यवंशी, रवींद्र गभणे, धनंजय कुरंजेकर, महेंद्र शहारे यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. यावेळी जलसंधारणची शपथ व लोगो अनावरण करण्यात आले.

मतदार पडताळणीला सहकार्य करा

जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत १० लाख १० हजार ७८८ मतदारांची पडताळणी सुरू असून १८ टक्के पूर्ण झाली आहे. प्रारूप यादी २४ ऑगस्ट २०१६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. गणना पत्र न भरलेल्यांनी १७ ऑगस्टपर्यंत बीएलऑंशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्यमंत्री मिसळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *