७ ऑक्टोबर ला शेतकरी रस्ता रोको करणार
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर
दै.लोकजन वृत्तसेवा
सिहोरा :- तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे. धान उत्पादकांना बोनस व कर्जमाफी देण्यात यावी या मागणीच्या पूर्ततेसाठी ७ ऑक्टोबर रोजी तुमसर बपेरा राज्य मार्गावरील हरदोली (सि) येथे रस्ता रोको करण्याचा इशारा पंचायत समिती तुमसरचे माजी उपसभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरचे संचालक अ.कलाम शेख यांनी उपविभागीय अधिकारी अंजली भोसले यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
तुमसर तालुक्यातील धान उत्पादकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
धान पिकावर मावा, तुडतुडा, करपा आणि खोडकिडा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हलक्या धान पिकांवरील रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत तुमसर व मोहाडी तालुक्याचा समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असंतोष खदखद लागला आहे. तहसीलदार तुमसर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता परिस्थितीचा आढावा घेऊन दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकी दरम्यान धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. कर्जबाजारी शेतकऱ्यांना जाहीर केल्या प्रमाणे २ लाख रुपयां पर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी. नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर राशि देण्यात यावी अशीही मागणी आहे. शेतकऱ्यांचे संकट केवळ पिकांच्या नुकसानी पुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक नियोजनावर, कर्ज परत फेडीवर आणि आगामी हंगामाच्या तयारीवर सुद्धा होत आहे. त्यामुळे केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष मदत, नुकसान भरपाई संदर्भातील निर्णय आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कालबद्ध कार्यवाही होणे आवश्यक असल्याची मागणी निवेदनात आहे.
शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास ७ ऑक्टोबर रोजी हरदोली (सिहोरा) येथील महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा अ. कलाम शेख व इतर शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी तुमसर व पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार यांना सुद्धा देण्यात आली आहे.








