आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुविधा उपलब्ध नसल्यास नोटीस द्या
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जिल्ह्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांची नियमित तपासणी करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याची खातरजमा करावी. सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळल्यास संबंधित आश्रमशाळांना तात्काळ नोटीस बजावावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नाबाबत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज सकाळी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुविधा, अंगणवाडी इमारती तसेच जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाबाबत सविस्तर आढावा घेतला.
आश्रमशाळांमध्ये कोणताही विद्यार्थी सुविधाभावी जमिनीवर झोपणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात यावी. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून एका महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडाराचे प्रकल्प अधिकारी हेडाऊ यांना दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी सावनकुमार, पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक निलेश भरने, निवासी उपजिल्हाधिकारी कमला मनोहर चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेऊन नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.








