संतापजनक! चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

भंडारा शहरातील घटना आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- शहरातील आंबेडकर वार्ड परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटेनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अवघ्या साडेतीन वर्षीय चिमुकलीवर ३० वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास आंबेडकर वॉर्ड परिसरात घडली. आरोपी (वय ३०) मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या बाबीची अधिकृत पडताळणी आणि तपास पोलिसांकडून सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीने स्वतःलाच दुखापत करून घेतल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला असून, पीडित बालिकेची वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून, तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *