परवानगी नाही, तरीही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची कत्तल आणि पोल उभारणी

दै. लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा :- करडी ते पालोरा – साकोली राज्य मार्गावर महावितरणच्या कंत्राटदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची कत्तल करून पोल उभे करण्याचा आणि तार लांबवण्याचा प्रकार समोर आला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उघड दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांडून होत आहे.

खडकी येथे विज वितरण विभागाने जागा खरेदी करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. तेथून करडी विज वितरण विभागाला वीज जोडणी द्यायची असल्याने कंत्राटदाराने राज्य मार्गाच्या अगदी कडेला पोल उभे करून तार लांबवली आहे.

करडी – पालोरा – साकोली हा रस्ता राज्य मार्ग असल्याने भविष्यत तो कधीही दुहेरी मार्ग होऊ शकतो. तसेच या मार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक असते. रस्त्याच्या जवळ पोल उभे असल्याने भविष्यात अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कामासाठी रस्त्याच्या कडेला असलेली झाडेही कापण्यात आली आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व माहिती असूनही काम बंद करण्यात आले नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, कंत्राटदाराची मनमानी उघड
पीडब्ल्यूडीची कबुली, तरी कारवाई शून्य
या प्रकरणी मोहाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘महावितरणच्या कंत्राटदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. याबत कंत्राटदाराला तोंडी काम बंद करण्यास सांगितले असून विज वितरण विभागाला ५ ऑगस्ट रोजी पत्रही दिले आहे. पत्र देऊनही काम बंद झालेले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून केवळ ‘मुठमाती’ दिली जात असल्याची चर्चा आहे.

कंत्राटदार आणि पीडब्ल्यूडीवर कारवाईची मागणी
नियम डावरून झाडे तोडणे, परवानगीशिवाय पोल उभारणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष या तिहेरी प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. त्यामुळे कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी, परवानगीशिवाय उभारले पोल हटवावेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *