रानडुक्कराच्या धडकेत दोन तरुण जखमी
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर बपेरा राज्य मार्गावर जंगली रानडुकरांचा उपद्र मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जंगल व शेत शिवारातुन रानडुकराचे कडप गावाच्या दिशेने धावतात आणी तेच अपघाताला कारणीभूत ठरतात. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. अशीच एक घटना २८ फेब्रुवारी रोजी तुमसर बपेरा राज्य मार्गावर असलेल्या चुल्हाड बुद्ध विहार जवळ घडली. यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात औषधोपचार करीत आहेत. २८ फेब्रुवारी रोजी रात्री १० च्या सुमारास मध्य प्रदेशातून आपल्या स्वगावी जाण्यासाठी येत असतांना चुल्हाड बुद्ध विहार जवळ रानडुकरांच्या कळपाने धडक दिल्यामुळे दोन्ही बाइक स्वार गंभीर जखमी झाले. यात सुकळी नकुल निवासी संतोष गौतम वय १९ वर्षे व मोंटू कटरे हे दोन्ही तरुण आपल्या बाईकने किसान भावनाकडे जात असतांना हा अपघात झाला.
घटनेचे वृत्त कळताच सिहोरा पोलिस घटनास्थळावर दाखल झाले व त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेत रुग्णालयात जाऊन पंचनामा केला आहे. आर्थिक मदतीची मागणी होत आहे. रान डुकरांच्या कडपाने बाईक स्वार प्रवाशात चांगलीच धडकी भरली आहे. प्रवासी भयभीत झालेले आहेत. या मार्गावर रान डुकरांमुळे अनेक अपघात झालेले आहेत. रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर झालेले अनेक नागरिक आजही आर्थिक मदतीपासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे.