पळसगाव-राका हादरले; ८२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून
घरात एकट्या राहणाऱ्या कुसुम कापगते यांच्या हत्येने खळबळ
दागिनें, रोख रक्कम लंपास चोरी की संपत्तीचा वाद? पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- सडक-अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-राका येथे घरात एकट्या राहणाऱ्या ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवार २ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. कुसुम चैत्राम कापगते (८२) असे मृत महिलेचे नाव आहे. खुनानंतर घरातील आलमारी फोडून सोनेचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आल्याने या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
कुसुम कापगते या पळसगाव-राका येथील आपल्या घरात एकट्याच राहत होत्या. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून त्यांचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घरातील साहित्य अस्तव्यस्त होते, तर आलमारी फोडण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घरातून सोनेचे दागिने, दोन सोन्याच्या पाटल्या आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले आहे. मात्र, चोरीला गेलेल्या मुद्देमालाचे नेमके मूल्य अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांचा तपास विविध दिशानी
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह घटनास्थल भेट देऊन पाहणी केली. त्यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जावेद खान यांना प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा, डुग्गीपार पोलिसांचे पथक आणि श्वान पथकाने घटनास्थलली तपासणी करून संभाव्य पुरावे संकलित केले.
प्राथमिक तपासात संपत्तीच्या कारणातून हत्या झाली असावी, या शक्यतेचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याने चोरीच्या उद्देशाने हत्या झाली का, की अन्य कोणत्या कारणातून हत्या करून चोरीचा आभास निर्माण करण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे तपासाची दिशा केवळ चोरीपुरती मर्यादित न ठेवता पोलिसांकडून विविध शक्यतांचा पडताळा केला जात आहे.
मुलगा औरंगाबादत; मुली नवेगावबांध, साकोलीत
कुसुम कापगते यांना तीन अपत्ये आहेत. त्यांचा मुलगा औरंगाबाद येथे अभियंता म्हणून कार्यरत असून, दोन मुली विवाहित आहेत. त्या नवेगावबांध आणि साकोली येथे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यामुळे वृद्ध महिला घरात एकट्या राहत असण्याची माहिती आरोपींना कशी मिळाली, घरात प्रवेश कोणत्या मार्गाने झाला आणि हत्येमागे नेमका कोणता हेतू होता, या प्रश्नांची उत्तरे शोधणे तपासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, एकाकी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या आणि त्यानंतर दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याने ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या घटनेचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सहायक पोलीस निरीक्षक जावेद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.








