निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे यांच्या ‘चपळ जशी नागीण गव्हळी’ पुस्तकातून झाडीपट्टीतील सापांचे विश्व उलगडले

राकेश बैस

साकोली (दै. लोकजन):- निसर्ग अभ्यासक, पक्षी तज्ञ आणि लेखक किरण पुरंदरे लिखित ‘चपळ जशी नागीण गव्हळी’ हे पुस्तक सध्या वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. झाडीपट्टीच्या बोलीभाषेतून सापांच्या विश्वाचा घेतलेला हा अनोखा शोध आहे.

या पुस्तकात लेखकाने झाडीमंडळ म्हणजेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा जंगल आणि भाताचे क्षेत्र असलेला प्रदेशाला ‘झाडीपट्टी’ म्हटले जाते, येथील निसर्ग आणि सापांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे पुस्तकाच्या शेवटी त्यांनी ‘शब्दांचे अर्थ आणि काही माहिती’ या सत्रात स्थानिक झाडीबोलीतील शब्दांचे अतिशय सोप्या भाषेत अर्थ सांगि तले आहेत.

यात नागाला ‘चोका’, गर्दीला ‘चेंगड’, मोहाच्या मोठ्या वृक्षाला ‘झाल’, तर घोणसाला ‘टबन्या’ आणि मण्यारला ‘दाडेकार’ असे म्हटले जाते, याची माहिती दिली आहे. तसेच वास्या किंवा नानेटी हा बिनविषारी साप, तर सतरंज्या म्हणजे पट्टेरी मण्यार जो ७ फूट ५ इंचांपर्यंत वाढू शकतो आणि लाजाळू असल्याने कचितच दिसतो, याबद्दलची वैज्ञानिक माहितीही दिली आहे.

टबन्या म्हणजे घोणस या विषारी सापाच्या हल्ल्याचा वेग सेकंदाला ८ फूट एवढा असतो, हे धक्कादायक तथ्यही लेखकाने मांडले आहे. चोका म्हणजे ‘स्पेक्टाकल्ड़ कोब्रा’ नागाची मादी एप्रिल-मे मध्ये १० ते १५ अंडी घालते आणि ६० दिवस अंड्यांची राखण करते.

पुस्तकासाठी लेखकाने दिलीमकुमार खैरे यांचे ‘साप’, स्वतःचेच ‘सखा नागझिरा’ आणि डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या ‘झाडीबोली-मराठी शब्दकोशा’चा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केला आहे. झाडीपट्टीतील साप, बोली आणि निसर्ग यांचा सुरेख संगम असलेले हे पुस्तक निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *