महाराष्ट्र भिकमुक्त व भुकमुक्त झाला पाहिजे

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचे आवाहन

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- सिग्नलवर, चौकात किंवा मंदिराबाहेर भिक्षा मागणाऱ्याला भीक न देता त्याचे पुनर्वसन करा. बेघर, रोजंदारीवरील मजुरांना शिवभोजन योजनेशी जोड़ा. गरोदर मातांना मातृवंदना योजनेतून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये, गरम ताजा आहार व अंगणवाडीतून कच्चा आहार दिला जातो. महाराष्ट्र भिकमुक्त व भुकमुक्त झाला पाहिजे, असे आवाहन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले.

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे हे तीन दिवसीय दौरयावर भंडारा येथे आले असता त्यांनी विश्रामगृहात उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी ढवळे म्हणाले, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून दिल्या जाणाऱ्या धान्याबाबत जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला असता, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी समाधानी असल्याचे दिसून आले. कार्डप्रमाणे धान्य मिळत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.

मात्र काही महिन्यांपासून निकृष्ट दर्जाच्या धान्य पुरवठ्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत अन्न व नागरी पुरवठा, आयसीडीएस व शालेय पोषण आहार विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे धान्य आढळल्यास अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार आयोगाला असलेल्या अधिकारानुसार सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पवनी व लाखांदूर तालुक्यातील नेरला, कोंढा, कलेवाडा व कन्हॉडला येथील शाळांची व अंगणवाडीची पाहणी केली. त्यावेळी त्यांना दोन शाळांमध्ये उंदीर व पाल दिसून आल्या. याबाबत अहवाल तयार करून संबंधित शाळांना नोटिस देण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. ‘हे निकृष्ट धान्य आपण आपल्या लेकराला खाऊ घालू शकतो का? आपले भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना स्वच्छ व दर्जेदार आहार मिळालाच पाहिजे,’ असेही महेश ढवळे म्हणाले.

शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला बचत गटांच्या वेळेवर मानधन न मिळण्याच्या तक्रारी राज्यभरात असून, याबाबतही दखल घेतली जाईल. त्यांनी लाखांदूर तालुक्यातील भटक्यांची वस्ती असलेली कोदामेढी येथे भेट देऊन गावकऱ्यांची अन्न धान्याबाबतीत चर्चा केली.

यावेळी आयोगाचे सदस्य ईश्वर बाळबुद्दे, जिल्हा अन्न व पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *