निर्माणाधीन पाण्याच्या टाकीवरून पडून १७ वर्षीय बालकाचा मृत्यू
लाखांदूर तालुक्यातील जिरोबा येथील घटना
दै. लोकजन वृत्तसेवा
लाखांदूर :- पश्चिम बंगाल येथून नातेवाईकांसोबत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम करण्यासाठी आलेल्या १७ वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील जिरोबा येथे घडली. दस्तगी मेहबू बालन असे मृत बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर येथे सात ते आठ महिन्यापासून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी पश्चिम बंगाल राज्यातील बिनाजपूर जिल्ह्यातून मजूर आणण्यात आले आहे. दस्तगी हा मजूर आणणाऱ्याचा नातेवाईक होता. तो मजुरांना पाणी आणून देणे व इतर लहानसहान कामे करीत होता.
बुधवारी सकाळी ८.०० वाजता काम सुरू झाले. सुमारे ११.०० वाजता दस्तगी हा पाण्याच्या टाकीवर चढला. वरच्या भागात फिरत असताना अचानक त्याचा तोल गेला. उंचीवरून खाली कोसळला. घटना लक्षात येताच मजुरांनी त्याला लाखांदूर येथे रुग्णालयात भरती केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थल धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.








