जिलाधिकाऱ्यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासोबतच ओपीडीतील गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथे भेट देऊन रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील आरोग्य सेवा, बाह्यरुग्ण विभाग, रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा तसेच रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेतला.

रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्यसेवा, उपचारांची गुणवत्ता, औषधोपचार तसेच रुग्णालयातील सुविधाबाबत माहिती जाणून घेतली असून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात होणारी रुग्णांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. रुग्णांना उपचारासाठी अनावश्यक प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने सेवा देण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांशी आपुलकीने, संवेदनशीलताने व सन्मानपूर्वक संवाद साधावा, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य सेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नसून रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि त्यांना समाधानकारक सेवा देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला. अग्निसुरक्षा लेखापरीक्षण नियमितपणे करून त्यातील त्रुटींची तातडीने पूर्तता करावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण, नातेवाईक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात तसेच रुग्णालयातील सेवा अधिक गतिमान, सुलभ और रुग्णाभिमुख करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या पाहणीदरम्यान डॉ. सुजाता दुधगावककर अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भंडारा, डॉ. संदिपकुमार गजभिये जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. अतुलकुमार टेंभुर्णे अति. जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सचिन चव्हाण अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, अनिल बनकर जिला विस्तार व माध्यम अधिकारी, डॉ. अजिंक्य आंबडकर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *