महिला बचत गटांनी ब्रॅण्डिंर्ग पॅकेजिंगवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. कोलते

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- उमेद-ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी मिनी सरस या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज दसरा मैदानात करण्यात आले. जिल्हास्तरीय प्रदर्शनीला उमेद च्या महिला बचत गटांची लक्षणीय प्रमाणावर उपस्थिती होती. उमेद बचत गटांची चळवळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यरत असून याचा उल्लेख मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देखील केला होता, असे सांगत महिला बचत गटांचे उत्पादनाला चांगले पॅकेजिंग आणि ब्रँडिंगची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, जिल्हा परिषद सदस्य स्वाती वाघाये, मनीषा निंबारते समाज कल्याण सभापती शितल राऊत यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक विवेक बोंद्रे, उमेदचे जिल्हा समन्वयक गौरव तुरकर व त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी उपस्थित होते.

आज उद्घाटन झालेल्या प्रदर्शनात सात मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत गटांची उपस्थिती असून गृहपयोगी वस्तू, चपला, दागिने, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ मसाल्याचे पदार्थ, तसेच पायपोस कलाकुसरीच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. आज दुपारी महिलांसाठी फॅशन शोचे देखील आयोजन करण्यात आले असून उद्या व परवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी भेट देऊन बचत गटांच्या विक्रीला हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक विवेक बोंद्रे यांनी केले आहे ३ मार्च ते ७ मार्च २०२५ या कालावधीत दसरा मैदान, शास्त्री चौक, वरठी रोड, भंडारा येथे हा विशेष महोत्सव पार पडणार आहे. स्वयं सहायता गटांच्या महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण उत्पादनांची येथे प्रदर्शनी व विक्री केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *