ट्रॅक्टरमुळे शेतातील चिखल रस्त्यावर, अपघाताचा धोका वाढला
काळी व चिकन मातीमुळे रस्ते निसरडे
ट्रॅक्टर मालक-चालकांवर कारवाईची गरज
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा: तालुक्यात सध्या सुरू असलेल्या भातरोवणीचा हंगाम सुरू आहे. ट्रॅक्टरमुळे शेतातील चिखल रस्त्यावर येत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शेतात चिखलणी करून ट्रॅक्टर पाण्याने न धुता, माखलेल्या चिखलासह रस्त्यावरून ये-जा केल्याने सार्वजनिक रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले आहेत. काळी आणि चिकन मातीच्या चिखलाने माखलेला ट्रॅक्टर रस्त्याने गेल्याने ट्रॅक्टरसोबत येणारी माती रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे रस्ते निसरडे झाले असून दुचाकी आणि लहान वाहनांना या रस्त्यावरून जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. ट्रॅक्टरच्या चाकांमुळे हा चिखल रस्त्यावर पसरून अनेक ठिकाणी दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
धानरोवणीसाठी जाणारे ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहने चालवत आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे आणि चिखलाचे डबके तयार झाले आहेत. रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश आणि चिखल यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
पावसाळ्यात शेतीचा हंगाम असला तरी शेताचे काम करताना सार्वजनिक रस्त्याची हानी होता कामा नये. काळ्या व चिकन मातीमुळे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर सार्वजनिक रस्त्यावर चिखल करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या ट्रॅक्टर मालक आणि चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
पोलीस विभाग लाखनीचे आवाहन
शेतात चिखलणी करून ट्रॅक्टर पाण्याने साफसफाई करून ट्रॅक्टर मालकांनी रस्ता सुरक्षेचा दृष्टिकोन समोर ठेवून सार्वजनिक रस्त्याने घेऊन जावे. तक्रार प्राप्त झाल्यास ट्रॅक्टर मालक-चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल तसेच आवश्यकता भासल्यास पोलीस स्टेशन लाखनीला कळवावे. असे आवाहन आशिष गजभिये, पोलीस निरीक्षक लाखनी यांनी केले आहे.








