शेतात वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
दैनिक लोकजन वृत्तसेवा
मोहाडी :- तालुक्यातील बेटाळा येथे शेतात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रामकृष्ण तुकडू देशमुख (वय ६०, रा. बेटाळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
रामकृष्ण देशमुख हे पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासह शेतात धानाचे परे टाकण्यासाठी गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पत्नी, मुलगा आणि सून यांनी शेतातील झोपडीत आश्रय घेतला. मात्र, शेतात चरत असलेल्या म्हशीला आणण्यासाठी रामकृष्ण देशमुख बाहेर गेले असता अचानक वीज कोसळली आणि ते जागीच कोसळले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बेटाळा येथील माजी सरपंच केशव शेंडे यांनी केली आहे.








