३३ केव्ही विद्युत तारेखाली अनधिकृत बांधकामावर नगरपरिषदेचा हातोडा
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- शहरातील नझुल भागात ३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीखाली सुरू असलेल्या धोकादायक व अनधिकृत बांधकामावर भंडारा नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंजूर नकाशाचे उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्या लक्ष्मीकांत केशवराव डोरले यांचे अतिक्रमणावर भंडारा नगर परिषदेने बुलडोजरच्या सहाय्याने पाडले.
सविस्तर असे की, लक्ष्मीकांत केशवराव डोरले यांना २४ तासांत स्वखर्चाने बांधकाम हटविण्याची नोटीस मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी बजावली आहे. भंडारा नझुल येथील गट क्र. १३८३/९, भूखंड क्र. ६ या १३३.०६ चौ.मी. जागेवर लक्ष्मीकांत केशवराव डोरले यांना रहिवासी वापरासाठी दि. २९ जुलै २०२४ रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष पाहणीत हे बांधकाम मंजूर नकाशानुसार होत नसल्याचे आढळले. नगर परिषदेच्या नियमानुसार उच्च दाबाच्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीपासून किमान ३.०० मीटर अंतर व समोरील रस्त्यापासून ५.०० मीटर समास अंतर सोडून बांधकाम करणे बंधनकारक आहे. परंतु, डोरले यांनी हे नियम धाब्यावर बसवून थेट विद्युत वाहिनीखालीच इमारतीचे बांधकाम सुरू केले.
या गंभीर बाबीची दखल घेत मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दि. २४ जुलै २०२६ रोजी नोटीस काढली. परवानगी व्यतिरिक्त केलेले अवैध बांधकाम तात्काळ थांबवून २४ तासांच्या आत स्वतःहून काढून टाकावे, असे आदेश देण्यात आले होते. आज मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या नेतृत्वात पथक डोरले यांचे अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबीसह पोहोचले. त्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, उच्चदाब विद्युत वाहिनीखालील बांधकामांवर नगर परिषदेने थेट कारवाई सुरू केल्याने शहरातील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशी कारवाई आवश्यक असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यापुढेही अशी कारवाई सुरू राहील, असे मत मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी व्यक्त केले.








