पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्य शासनाने जाहीर केलेली “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ म्हणजे केवळ घोषणाबाजी असून, त्यातील जाचक अटी व शर्तींमुळे राज्यातील लाखो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून एक प्रकारे “कर्जवसुली’ करणारी ठरत असल्याचा आरोप करत, या योजनेतील सर्व जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बैठकीत एकमताने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

याच मागण्यांना घेऊन पक्षाचे युवा नेते आमदार रोहितदादा पवार हे येत्या १२ जून २०२६ पासून पंढरपूर येथे “अन्नत्याग आंदोलन’ सुरू करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात तुमसर आणि मोहाडी येथील तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांच्या नावेअसलेले मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांमार्फत हे निवेदन शासनाकडे पाठवले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *