अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून केला व्हायरल

✻ गोबरवाही पोलिसांनी केली ५ आरोपींना अटक
✻ आरोपींत २ अल्पवयीन मुलांचाही समावेश

दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर:- नातेसंबंध आणि माणुसकीला काळिमा फासणारी, तसेच ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशन च्या हद्दीत उघडकीस आली आहे. एक १५ वर्षांच्या निष्पाप अल्पवयीन शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आला. एवढ्यावरच या विकृतांचे मन भरले नाही. तर त्या व्हिडिओच्या बळावर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली. मुलीने या नराधमांना कडाडून विरोध करताच, त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची समाजात बदनामी केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा सुन्न झाला. गोबरवाही पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध ‘पोक्सो’ आणि ‘भारतीय न्याय संहिते’नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोबरवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावात एका १५ वर्षीय पिडीत मुलीला आरोपी भावेश यादव (वय १९, रा. सिंडिकेट कॅम्प, डोंगरी माइन्स) याने ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही प्रेमाचे आमिष दाखवले. २४ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री भावेश पिडितेच्या घरी गेला. ते दोघे बेडरूममध्ये असतानाच, आधीच दबा धरून बसलेले त्याचे मित्र क्षितीज पटले (वय १९, रा. डोंगरी बुज), बाल्या उर्फ करण चौधरी (वय २१) आणि त्यांच्यासोबत असलेले इतर दोन विधीसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) मुले अचानक बेडरूममध्ये घुसली. यावेळी आरोपी क्षितीज पटले याने त्याच्या मोबाईलमध्ये त्या दोघांचा व्हिडिओ शूट केला.

नकार दिला म्हणून अबू वेशीवर टांगली
व्हिडिओ काढल्यानंतर सदर आरोपीने पिडीत मुलीला गाठून, तो व्हिडिओ दाखवून भीती दाखविली आणि स्वतःची वासना शमवण्यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, या भयानक आणि जीवघेण्या प्रसंगातही पिडीत मुलीने प्रचंड धैर्य दाखवत त्यांच्या या मागणीला स्पष्ट नकार दिला. आपली इच्छा पूर्ण होत नाही हे पाहून संतापलेल्या या नराधमांनी पिडितेची समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने तो आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

‘या’ कलमांनुसार गुन्हा दाखल
व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजताच पिडितेच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर तिने धैर्याने गोबरवाही पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून गोबरवाही चे ठाणेदार शरद शेवाडे यांच्या लेखी आदेशाने पोलिसांनी त्या नराधमांविरुद्ध कायद्याचा कठोर बडगा उगारत भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२)(१) (बलात्कार), ६५(१), ७५ (२)(लैंगिक छळ) पोक्सो कायदा सहकलम ४ आणि ६ (अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार), माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी ॲक्ट): कलम ६७ (अ) (अश्लील साहित्य प्रसारित करणे) यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *