नियोजन समितीव्दारे गुणवत्तापूर्ण काम करावे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे. भंडारा जिल्हा नियोजन समितीव्दारे यंत्रणांना प्राप्त निधीतुन जिल्हा विकासाची गुणवत्तापुर्ण काम करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज केले. नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, सहायक आयुक्त सचिन मडावी, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडु उपस्थित होते. जिल्ह्यातील पर्यटन, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन जिल्ह्याला समृध्दी प्राप्त करुन देणार आहे.

जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेली, तसेच नव्याने सुरु होणारी विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. जिल्हा वार्षिक योजनेतील कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, निधी वेळेत खर्च करावा, असे निर्देश त्यांनी दिले. जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा घेतांना ३९१ कामे पुर्ण झाली असून ३०१ काम प्रगतीपथावर आहेत. कामाच्यासाठी लागणाऱ्या निधीची शासनाकडे मागणी करण्यात यावी, असे ही निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हा क्रीडा संकुलातील सोयी सुविधासाठी त्रयस्थ यंत्रणेची नेमणुक करण्याबाबतही त्यांनी यावेळी निर्देश दिले. क्रीडा संकुलातील सोयी सुविधा तसेच अभ्यागतांची नोंदवही ठेवण्यात यावी. सिंथेटीक ट्रॅकचे काम जलदगतीने करावे. तसेच तालुका क्रीडा संकुलातील खेळांडुना सोयी सुविधा देण्यात याव्यात असेही त्यांनी निर्देश दिले. जिल्हा नियोजन समीती, जलजीवन मिशन, जिल्हा क्रीडा संकुलाच्या तीनही बैठकीनंतर पत्रकार परिषदेतपालकमंत्री सावकारे यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *