हिरकणी बसच्या चाकाखाली सापडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- आपल्या मामीसोबत गावाकडे परतत असताना दुचाकीचा तोल गेल्याने एका २६ वर्षीय तरुणाचा एसटी महामंडळाच्या हिरकणी बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर त्याची मामी गंभीर जखमी झाली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी सुमारे सव्वादहा वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय मोहाडीच्या मागील बायपास रस्त्यावर घडली. आकाश प्रकाश कटबर्ये (वय २६, रा. हरदोली-झं.) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आकाश कटबर्ये हा आपल्या मामा मनोज कुर्वे यांच्या कुटुंबातील झाडतोडीच्यावादासंदर्भात तक्रार करण्यासाठी मामी अनिता मनोज कुर्वे (वय ४०) यांच्यासह मोहाडी पोलीस ठाण्यात आला होता. तक्रार नोंदवून दोघेही दुचाकीने हरदोलीकडे परतत होते.
दरम्यान, तुमसर-भंडारा राज्य मार्गावरील ग्रामीण रुग्णालयाजवळ एका अज्ञात भरधाव दुचाकीस्वाराने कट मारल्याने त्यांच्या वाहनाच्या हँडलला त्या दुचाकीचा स्पर्श झाला. त्यामुळे आकाशच्या दुचाकीचा तोल गेला. अनिता कुर्वे या रस्त्याच्या एका बाजूला फेकल्या गेल्या, तर आकाश समोरून नागपूरकडे जात असलेल्या एसटी महामंडळाच्या हिरकणी बस (क्र. एमएच०६/बीडब्ल्यू-१४३) च्या चाकाखाली आला. या भीषण अपघातात त्याचा जागीच करुण अंत झाला. अपघातानंतर तेथून जात असलेल्या पोलीस जीपचे चालक पृथ्वीराज राठोड यांनी तत्परता दाखवत स्थानिक युवकांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती आकाश कटबर्ये याला मृत घोषित केले.
जखमी झालेल्या अनिता कुर्वे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे रेफर करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दुर्योधन भुरे, लांजेवार, कल्पना फड आणि ज्योत्सना बानासुरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









