गोंदिया जिल्ह्यातील युवकाचा साकोलीत खून
दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- गोंदिया जिल्ह्यातील मुरपार येथील रहिवासी असलेला मृतक निखिल राजकुमार कांबळे यांचा आज दि. २२ मे रोजी सकाळी साकोली येथील गड कुंडली रोडवरील तलावाच्या काठावर रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. साकोली पोलिसांनी मृतकाच्या वडिलाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास साकोली पोलीस करीत आहे. शहरातील गडकुंभली रोड परिसरातील तलावाजवळील मैदानावर दररोजप्रमाणे शुक्रवारी सकाळी काही युवक क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते.
यावेळी तलावाच्या पाण्याशेजारी एका युवकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह, मोटारसायकल क्र. एमएच ४० के ५०९९ व बॅड पडलेली दिसली. मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने युवकांनी तात्काळ साकोली पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसराचा ताबा घेतला. निखिल कांबळे हा मूळ सडक अजर्ुनी तालुक्यातील रहिवासी असून, तो काही महिन्यांपासून साकोली येथे वास्तव्यास होता. स्थानिक पंचशील वार्डमध्ये भाड्याच्या खोलीत राहत असलेला निखिल साकोलीतील एका वाईन शॉपमध्ये आठ हजार रुपये मासिक वेतनावर काम करीत होता.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतकावर डुगीपार पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता आणि तो सुमारे महिनाभरापूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. दिनांक २१ मे रोजी निखिल आपल्या मूळ गावी मुरपार-लेंडेझरी येथे गेला होता. कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तो मोटरसायकलने साकोलीकडे परतण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत पाण्याचा खाली कॅन देखील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह तलाव परिसरात आढळल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. घटनेनंतर साकोली पोलिसांनी फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले.
पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. मृतकाच्या हालचाली, मोबाईल संपर्क, शेवटचे लोकेशन तसेच घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंच्या आधारे तपास सुरू असून, पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत. दरम्यान, भरवस्तीजवळील तलाव परिसरात एवढ्या क्रूर पद्धतीने युवकाचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साकोली पोलिसांनी मृतकाचे वडील राजकुमार कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. आरोपींचा लवकरच छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूर, पोलीस निरीक्षक तायवाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राजू साळवे तपास करीत आहेत









