अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तालुक्यातील पळसपाणी-चांदोरी मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात साकोली येथील करंजेकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थी पालोरा येथील औद्योगिक भेट आटोपून साकोली कडे परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या करंजीच्या झाडावर आदळले. या अपघातात सौंदड येथील कुणाल गोटेफोडे (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला. तर लाखांदूर तालुक्यातील चिकना/बारव्हा येथील महेश टांगशेलवार (वय २०) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. वरील अपघातातील दोघेही करंजेकर इंजिनिअरिंग कॉलेज, साकोली येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते.

मृतक महेश टांगसेलवार हा अभियांत्रिकीच्या स्थापत्यशाखेचा तृतीय वर्षाच्या विद्यार्थी होता तर कुणाल गोटे पुढे हा अभियांत्रिकीच्या स्थापत्य शाखेच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी होता. करंजेकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने पालोरा येथील बिटूनिन प्लांट येथे महाविद्यालयातील २ प्राध्यापक व १४ विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार आपापल्या दुचाकी वाहनाने औद्योगिक भेटी करिता गेले होते. दोघेही दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएन ५४९३ ने साकोलीकडे परत येत होते. दरम्यान, पळसपाणी येथील सुंदरटोला मार्गावर दुचाकी अचानक अनियंत्रित झाली व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडावर जोरात धडकली. अपघात इतका भीषण होता की, कुणाल गोटेफोडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या महेश टांगशेलवार याला तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मावली. घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शी निखिल मेश्राम यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिका सेवेला संपर्क साधून मदत बोलावली तसेच पोलिस प्रशासनालाही माहिती दिली. साकोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू साळवे करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या तरुण मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *