चिंचगड पोलिसांची धाडसी कारवाई; कत्तलीच्या दाढेतून १० गोवंशांची सुटका
दै.लोकजन वृत्तसेवा देवरी:- चिंचगड पोलीस स्टेशन अंतर्गत मिसपिरीहितापन्हाडी जंगल परिसरात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या १० गोवंश जनावरांची पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुटका केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अंदाजे ५४ हजार रुपयांचा गोवंश जप्त केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. २१ मे रोजी सकाळच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास खासबागे व पोलीस कर्मचारी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते.
दरम्यान, मौजा मिसपिरी गावालगतच्या जंगल परिसरात काही गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना विश्वासू मुखबिरामार्फत मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी पंचांसह जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली. मिसपिरी गावाच्या पूर्वेकडील दाट जंगलात झुडपांआड काही झाडांना आधूड दोरीने बांधून ठेवलेली जनावरे आढळ ून आली. या जनावरांसाठी चारा, पाणी किंवा अन्नाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. तहानभुकेने व्याकुळ झालेली जनावरे अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने त्यांची सुटका केली. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी उपस्थित असलेला एक अज्ञात इसम जंगलाच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला,
मात्र दाट जंगलाचा फायदा घेत आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरला. या कारवाईत चार मोठ्या गाई, दोन लहान गाई आणि चार वासरे असा एकूण १० गोवंश जप्त करण्यात आला. जप्त जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना गोशाळेत हलविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक कैलास खासबागे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिंचगड पोलीस करीत आहेत.









