महाकुंभमेळाव्यात न जाणाऱ्यांसाठी आज भंडारा येथे कुंभस्नान
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- प्रचंड इच्छा असूनही प्रयागराज येथे पोहोचू न शकलेल्या श्रद्धाळूसाठी गंगेच्या पवित्र स्नानाची सोय बहिरंगेश्वर मंदिर जवळ, खांब तलाव भंडारा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०..०० ते दुपारी १.०० वाजतापर्यंत करण्यात आली आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी खासदार सुनिल मेंढे यांनी पत्रपरिषदेतून केले आहे. माजी खासदार सुनिल मेंढे पुढे म्हणाले, हिंदू संस्कृतीच्या परंपरेनुसार मकरसंग्रात ते महाशिवरात्रीपर्यंत प्रयागराज येथे कुंभमेळावा आयोजित करण्यातआला आहे. सन्नी कन्ट्रक्शन कंपनीतर्फे प्रयागराज येथील कुंभ मेळाव्यात दोन टेंट लावण्यात आले होते. अनेकांची या कुंभमेळाव्यात येवून त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्याची ईच्छा होती. पण ते येवू शकले नाही. त्यांच्यासाठी आपण प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील अमृत जल टँकर द्वारे आणून कुंभस्नान सोहळ्याचे आयोजन केले आहे.
भंडारा व गोंदिया येथे प्रत्येकी १० हजार लिटरचे टँकर आले आहेत. हे टँकरचे पाणी तीन लहानटँकरमध्ये घालून, महिला व पुरुष तसेच वयस्क यांचेवर फवारा करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त खांबतलाव येथे यात्रा भरते. गर्दी होवू नये म्हणून शितला माता मंदिराकडून येण्याचा दुसरा मार्ग तयार करण्यात आला आहे. माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून व सकल हिंदू समाज भंडारा यांच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभागी होत, गंगा स्नानाचे पुण्य पदरी पाडून घ्यावे, असे आवाहन सुनील मेंढे यांनी केले आहे. पत्रपरिषदेत सुनील मेंढे, संजय एकापुरे, विकास मदनकर, मयूर बिसेन, बत्रा उपस्थित होते.