वादळी पावसाचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ४ वाजता अचानक आलेल्या वादळी पावसाने अवघ्या पंधरा मिनिटांत जनजीवन विस्कळीत केले. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, दुकानांची छत उडाली आणि बाजारपेठेत ऐनवेळी धांदल उडाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा इशारा होता. मात्र प्रत्यक्षात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आकाश काळवंडले आणि काही क्षणांतच वादळासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
पंधरा मिनिटे झालेल्या या पावसात शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुख्य रस्त्यावरकोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. ग्रामीण भागातही अंधाराची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते,कापणीला आलेल्या उन्हाळी धानाला वादळी पावसाचा फटका बसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांशी संपर्क साधून नुकसानीची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेचा कडाका वाढला होता. त्यातच वादळी पावसाने दिलासा दिला असला, तरी शेतकऱ्यांसाठी तोच पाऊस संकट बनून आला आहे.









