मोहाडीत पाणीटंचाईची झळ तीव्र

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सूर नदीतील पाणीसाठा पूर्णतः आटल्याने नगरपंचायतीच्या हद्दीतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दोन ते तिन दिवसाआड नळाला पाणी येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. दैनंदिन जीवनावर याचा थेट परिणाम होत असून महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ता भूषण गभने यांनी पुढाकार घेत “जल ही जीवन है’ हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

कोणत्याही शासकीयमदतीची प्रतीक्षा न करता त्यांनी स्वतःच्या खर्चातून टँकरद्वारे शहरातील विविध भागांत पिण्याच्या पाण्याचे वितरण सुरू केले आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे अनेक कुटुंबांची पाण्याची गरज भागत असून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही भागांत महिलांना पाण्यासाठी लांब अंतर पायपीट करावी लागत होती. तर काही ठिकाणी पाण्याअभावी दैनंदिन कामकाज ठप्प झाले होते. अशा वेळी भूषण गभने यांच्या उपक्रमामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. “अडचणीच्या काळात कोणी तरी मदतीला धावून आले.’ अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीमुळे नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पाणीटंचाईसारख्या मूलभूत समस्येवर दीर्घकालीन नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. भूषण गभने यांच्या या सेवाभावी कार्याचे शहरभरातूनकौतुक होत असून अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे येत आहेत. “जल ही जीवन है’ या संदेशातून त्यांनी केवळ पाणीपुरवठाच केला नाही, तर समाजासमोर एक सकारात्मक आदर्शही उभा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *