पाच वर्षीय मुलीचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- भंडारा वनविभागाच्या साकोली वनपरिक्षेत्रात एक वर्षापूर्वी ५ वर्षीय चिमुकलीचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले. जेरबंद बिबट्याला निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. मौजा विर्शी, नियतक्षेत्र किन्ही, सहवनक्षेत्र साकोली येथे १५ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने छत्तीसगडच्या बलौदा बाजार जिल्ह्यातील सुहेला येथील रहिवासी काशीराम मिरी यांची ५ वर्षीय मुलगी कु. अंशिका मिरी हिच्यावर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात अंशिकाचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेनंतर मौजा विर्शी व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग व सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. कटरे यांनी वन्यप्राणी बचाव दल, भंडारासाकोली व साकोली वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांसह शोध मोहीम सुरू केली.

बिबट्याच्या भ्रमणमार्गावर ट्रॅप कॅमेरे बसवून त्याचे नियमित संनियंत्रण करण्यात आले. त्याच मार्गावर ट्रप पिंजरेही लावण्यात आले होते. अखेर ४ मे २०२६ रोजी लावलेल्या एका ट्रप पिंजऱ्यात हल्लेखोर बिबट्या अडकला. त्याला सुरक्षितपणे जेरबंद करून निसर्ग अधिवासात सोडण्यात आले. मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना घडल्यास स्थानिकांनी वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वन्यजीव मानवी वस्तीत दिसल्यास तातडीने जवळच्या वनकर्मचाऱ्याला किंवा हॅलो फॉरेस्ट हेल्पलाइन १९२६ किंवा वनविभाग भंडारा नियंत्रण कक्ष ०७१८४-२५२२८३ वर संपर्क साधावा, असेही कळवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *