जन्मतारखेचा घोळ उघड ः देव्हाडी ग्रामपंचायतीतील लिपिकावर कारवाईचे आदेश

दै. लोकजन वृतसेवा तुमसरः- देव्हाडी ग्रामपंचायतीतील लिपिक अशोक चैतराम मोहारे यांच्या जन्मतारखेतील तफावत प्रकरणी अखेर पंचायत समिती तुमसर प्रशासनाने कडक भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. सेवा पूर्ण झाल्यानंतरही शासकीय कामकाज सुरू ठेवल्याचा गंभीर ठपका ठेवत संबंधितांवर शिस्तभंगात्मक कारवाईसह वेतन वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचायत समिती तुमसर येथील गट विकास अधिकाऱ्यांनी दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी देव्हाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात हा प्रकार उघडकीस आला आहे.

यापूर्वी ग्रामपंचायतीने सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत जन्मतारखेबाबत विसंगती आढळून आली. संबंधित लिपिकाच्या शालेय दाखल्यांमध्ये वेगवेगळ्या जन्मतारखा नमूद आहेत. एका प्रमाणपत्रात ०२/०४/१९६९ अशी जन्मतारीख दर्शविण्यात आली असताना, दुसऱ्या शासकीय नोंदवहीत ०२/०६/१९६६ अशी नोंद आहे. यामुळे सेवा निवृत्तीच्या तारखेत फरक पडत असून, प्रत्यक्षात सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी काम सुरू ठेवल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, चुकीची माहिती सादर केल्याबद्दल संबंधित लिपिकावर नियमानुसार कारवाई करून त्यांना सेवेतून निवृत्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच, वास्तविक जन्मतारखेप्रमाणे ज्या कालावधीत त्यांनी सेवा बजावली नाही त्या कालावधीतील मिळालेले वेतन वसूल करण्याचीही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सात दिवसांच्या आत पंचायत समिती कार्यालयात सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.या घटनेमुळे ग्रामपंचायतीतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *