१८ संघटनांचे तीन हजार कर्मचारी संपावर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना प्रसिद्ध करणे तसेच इतर महत्त्वाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्राच्या आवाहनानुसार त्रिमूर्ती चौक भंडारा येथे रामभाऊ येवले, निमंत्रक सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, भंडारा यांच्या नेतृत्वात दिनांक २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संपाची सुरुवात झाली असून सदर संपामध्ये भंडारा जिल्यातील एकूण १८ संघटनांचे जवळपास तीन हजारच्या वर कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे महसूल, कोषागार, सामान्य रुग्णालय येथील कामकाज पूर्णतः ठप्प झालेले आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून मागण्या मान्य कराव्यात, अशी विनंती संघटनेचे पदाधिकारी यांनी केलेली आहे.

राज्यातील सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून सुमारे १७ लाख कर्मचारी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. आमच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने कोणताही पुढाकार घेतला नसल्याने संपावर जाण्याची भुमिका घेतली आहे. हा संप बेमुदत असणार आहे, असे सरकारी, निमसरकारी, शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती भंडाराचे निमंत्रक रामभाऊ येवले यांनी सांगितले.

राज्यभरातील कर्मचारी या संपात सहभागी झाले असल्यानेमंत्रालयापासून ते तालुकास्तरापर्यंत राज्य सरकारचा कारभार प्रभावित झाला आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचारीही संपात सहभागी गेले असल्याने रुग्णसेवेवरही परिणाम झाले आहे. या संपात राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ देखील सक्रियपणे सहभागी झाला आहे. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी, शिक्षकांनी गेल्या वर्षभरात सात वेळा आंदोलने छेडली. परंतु शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा संताप अनावर झाला आहे, असे समन्वय समितीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *