महामानवाला अभिवादनः “जयभीम’ च्या घोषणेने दुमदुमला

 जिल्हा दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, माझ्या भीमाचं नावाचं कुंकू लाविलं रमानं, एकच साहेब बाबासाहेब’ यासह जयभीमच्या घोषणेने भंडारा जिल्हा दुमदुमला. भंडारा शहरात सायंकाळच्या सुमारास निघालेल्या निळ्या पाखरांच्या मिरवणुकीने वातावरण “भीममय’ झाले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तरुणांचा उत्साह ओसंडून वाहतहोता. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी वाखाणण्याजोगी होती.

भंडारा शहरात शास्त्रीनगर, खात रोड, नाशिकनगर व अन्य ठिकाणांहून निघालेली २७ चित्ररथ असलेली भीम रॅली मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत त्रिमुर्ती चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ येऊन विसावली. यावेळी हजारो भीम बांधव व भगिनींनी महामानवाच्या चरणी नतमस्तक होऊन बाबासाहेबांचा एकच जयघोष केला. त्रिमुर्ती चौकात सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत बुद्धवंदना केली. यावेळी स्मारक समितीचे सर्वच पदाधिकाऱ्यांसह समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गांधीचौकात नगर परिषदेच्यावतीने, बसस्टॉप येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

जिल्ह्यातील तालुका स्थळासह ग्रामीण भागातहीसकाळपासूनच भीम सैनिकांसह समाजबांधवांनी ठिकठिकाणी दुचाकी रॅली काढली. भंडारा शहरात सकाळी काढलेल्या दुचाकी रॅलीने भंडारेकरांचे लक्ष वेधून घेतले. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे व सरबतचे वितरण करण्यात आले. गावागावांतून जयभीमचा गजर करीत मिरवणूक काढण्यात आली. विविध संघटनांनी शहरासह ग्रामिण भागात सामाजिक व प्रबोधत्नाक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जागोजागी महाप्रसाद व शरबत वितरण करण्यात आले. रात्री गावोगावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची साऊंड सिस्टीम डिजेवर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब, रमाई यांच्या वेषभुषेत युवक व मुली होत्या. मिरवणुकीत सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती. हिंदू व मुस्लिम बांधवांनी सुद्धा अनेक ठिकाणी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *