शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी आज काँग्रेसचा मोर्चा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत ८७८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यासाठी जि. प. शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी दि. १० मार्चपासून जिल्हा परिषदसमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. विशेष म्हणजे सर्व जि. प. पदाधिकारी व सदस्य यांनी नरेश ईश्वरकर यांचेसोबत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून भंडारा जिल्हा काँग्रेसच्यावतीने दि. १७ मार्च २०२६ रोजी दुपारी ११ वाजता जिल्हा परिषद चौकात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिली.
भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळा ७६१ व हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय ३२ आहेत. यात मध्यम व गरीब कुटूंबातील ७० हजाराच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ नुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. सद्यास्थितीत विविध संवर्गातील ८७६ शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये ८७६ शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी मंजुरी देवून तशी घोषणा करावी अन्यथा असा इशारा जि. प. शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकरयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून करण्यात आला होता.
मात्र, अर्धे अधिवेशन संपल्यानंतरही त्या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्हा पदाधिकारी व सदस्य यांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. मोहन पंचभाई पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील शाळा मोडकळीस आणून अशिक्षितसमाज घडवू पाहत आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षकांची पदे तात्काळ भरून ग्रामीण भागातील शाळा वाचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व काँग्रेस फ्रंटल सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, तालुका व शहर अध्यक्ष तसेच पदाधिकारी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, न. प. सदस्य, सभापती, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व नागरिक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी यांनी या मोर्चात बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भंडारा जिल्हा काँग्रेसच कमिटीचे अध्यक्ष तथा जि. प. सदस्य मोहन पंचभाई यांनी केले आहे.






