चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यावर वरठी येथील मयुरी चौधरी हिचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सुट्टी असल्याने मित्रांसह तामिळनाडू राज्यातील चेन्नईच्या समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या कु. मयुरी हरिश्चंद्र चौधरी रा. वरठी, ता. मोहाडी हिचा मृत्यू झाला. यामुळे वरठी येथे शोककळा पसरली आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष भंडारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथे महाराष्ट्रातील २६ तरुण कॉग्नीझंट या आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिप करीत होते.

दि. २१ फेब्रुवारी रोजी सुट्टी असल्याने ही सर्व मुले चेन्नई येथील पोंडेचेरी रोडवर असलेल्या कांथाट्टूर पोलीस स्टेशन हद्दत असलेल्या गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी समुद्रात १० ते १५ फुटांच्या लाटा निर्माण होऊन मुलांचा सर्व ग्रुप सेल्फी घेत असतांना मोठ्या लाटेत समाहीत झाले. त्यातील ३ तरुण समुद्रात वाहून गेली. तेथील पोलीस स्टेशनकडून जिल्हा नियंत्रण कक्षाने घेतलेल्या माहितीनुसार त्यापैकी एक मृतदेह मिळाला आहे.

सदरचा मृतदेह हा कु. मयुरी हरिश्चंद चौधरी, रा. वरठी, ता. मोहाडी हिचा आहे. जय पाटील नावाचा विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहे. राज केदारी नावाच्या तिसऱ्या मुलाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती आहे. मयुरी चौधरी हिचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय चेन्नई येथे ठेवण्यात आला असून वरठी येथे आणण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा प्रशासन भंडारा व राज्य प्रशासन चेन्नई प्रशासनासोबत संपर्क साधून आहेत. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिली. मयुरी चौधरी ही १५ दिवसापूर्वीच दि. ५ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे आयटी कंपनीत इंटर्नशिप म्हणून रुजू झाली होती.

आज सकाळी ७ वाजता एका मुलींकडून मयुरी हिच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबियांना कळले. मयुरी चौधरी हिचे नातेवाईक चेन्नईसाठी रवाना झाले आहेत. तिच्या कुटुंबात आईवडिल, भाऊ व बराच आप्त परिवार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद घटनेबद्दल मयुरी चौधरी यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *