“दादा’ या नावाने तुमसर गहिवरला!
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्भीड, धडाडीचे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याविषयी व्यक्त झालेल्या भावनांनी आज तुमसर शहर भावूक झाले. आ. राजूभाऊ कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालय, तुमसर येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि अजितदादांचे असंख्य चाहते या शोकसभेस उपस्थित होते.
सर्वांनी एकत्र येत “दादा’ या नेतृत्वाबद्दल आपल्या भावना आणि कृतज्ञता व्यक्त केल्या. यावेळी मा. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करूनभावपूर्ण, अश्रूपूर्ण श्रद्धांजली व आदरांजली वाहण्यात आली. “एकच वादा, अजितदादा’, “अजितदादा अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अनेकांचे डोळे पाणावले होते, तर वातावरण पूर्णतः शोकमग्न झाले होते.
या सर्वपक्षीय शोकसभेत संवेदना व्यक्त करणाऱ्यांमध्ये आ. राजूभाऊ कारेमोरे, माजी खा. मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे, महिला व बालकल्याण सभापती अनिता नलगोपूलवार, शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर, जिल्हा परिषद सदस्य आनंद मलेवार, राजुभाऊ माटे, देवचंद ठाकरे, प्रमोद तितिरमारे, माजी नगराध्यक्ष गीता कोंडेवार, योगेश सिंगनजुडे, राजेश देशमुख, उमेश तुरकर, हंसराज ठवकर, माजी सभापती पंचायत समिती तुमसर नंदू रहांगडाले, पंचायत समिती तुमसर सभापती सौ. गौपाले, माजी सभापती पंचायत समिती मोहाडी रितेशभाऊ वासनिक, जे. सी. इंजि. गौरव नवरखेडे, जे. सी. इंजि. अनिल गभणे, कान्हा बावनकर, पंकज बालपांडे, अमरीश सानेकर, पमा ठाकूर, नगरसेविका शीतल निशिकांत पेठे, नगरसेविकासोनिया मनीष धुर्वे आदी मान्यवरांचा समावेश होता. शोकसभेत बोलताना उपस्थितांनी अजितदादांचे स्पष्ट बोलणे, वेळेचे काटेकोर नियोजन, प्रशासनावरची पकड आणि सर्वसामान्यांशी असलेले नाते यांचा आवजर्ून उल्लेख केला.
“दादा म्हणजे धडाडी, निर्णयक्षमता आणि नेतृत्वाचा ठसा’ असे भावपूर्ण उद्गार अनेकांनी काढले. अभिवादन कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य राहूल डोंगरे यांनी केले. शोकसभेच्या शेवटी संपूर्ण परिसर काही काळ स्तब्ध झाला होता. “दादा, पुन्हा याः’ अशी आर्त हाक अजितदादांच्या चाहत्यांच्या मनातून उमटत होती. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राला पोरकेपणाची जाणीव झाली असल्याची भावना उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. दादांचे चाहते अखेरचा निरोप देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.







