रेतीघाट झाले रिकामे,कोटीने रेती चोरी
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- वैनगंगा नदीच्या पांढऱ्या व दाणेदार रेतीला सर्व दूर मोठी मागणी आहे.दरवर्षी रेतीच्या व्यवसायावर कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते आहे. मागील अनेक वर्षापासून वैनगंगा नदीतील एकाही घाटाचा लिलाव न झाल्याने या दरम्यान कोट्यावधी रुपयाच्या रेतीची रेत माफीयांनी चोरी केली आहे.
रेती चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कार्यवाहीचे निर्देश दिले की काय त्यात तुरळक रेती चोरट्यांना पकडण्यातही आले.काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात नदीतून रेतीचा उपसा झाल्याने रेती घाटावर आता रेती शिल्लकनसल्याचे विदारक चित्र दिसत आहे.परिणामी नदीपात्रात वाळू उपलब्ध नसल्यानेच रेती घाट लिलाव प्रक्रिया अडचणीत आली असावी असे वाटते.
वैनगंगा नदीच्या जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही.रेतीची आवश्यकता पाहता रेती माफीयांनी मागील दिवसात करोडो रुपयाच्या रेत चोरीची उलाढाल केली आहे. दररोज शेकडोच्या घरात ट्रक, ट्रॅक्टर व टिप्परने रेती चोरून नेतांना दिसायचे.हा प्रकार उशिरा काहोईना जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच या रेत माफियावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या निर्देशानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक ट्रकांवर कारवाई करीत रेती पकडली.मात्र त्याचा पाहिजे तसा परिणाम रेत माफियांवर झाला नाही. त्यामुळेच राजरोसपणे रेतीचा उपसा केला गेला व केला जात आहे.काही ठिकाणी मात्र महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली व दंडही वसूल करण्यात आला.मात्र त्याचा पाहिजे तसा उपयोग झाला नाही.रेतीला बाहेरील शहरात मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्याने शासनाच्या कोणत्याही निर्देशाला न जुमानता आजही रेतीची चोरी सुरूच आहे.







