शासकीय कंत्राटदारांनी पालकमंत्री, खासदार व आमदारांना दिले निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांना नियमानुसार कामे मिळत नसल्याबाबत व राजकीय हस्तक्षेपावर निर्बंध घालण्याबाबत शासकीय कंत्राटदार संघटनेच्यावतीने पालकमंत्री पंकज भोयर यांना निवेदन देण्यात आले. ख. डॉ. प्रशांत पडोळे, आ. नाना पटोले व आ. राजू कारेमोरे यांना सुद्धा निवेदन दिले.
शासकीय कंत्राटदारांनी दिलेल्या निवेदनानुसार, जिल्ह्यातील विकास कामांचे वाटप नियमानुसार न करता राजकीय दबावामुळे हस्तक्षेप व पक्षपात केल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक पात्र कंत्राटदारांना त्यांच्या हक्काची कामे नाकारली जात आहेत. असा हस्तक्षेप हा बेकायदेशीर, मनमानी व भेदभाव पूर्ण असून नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे सरळ उल्लंघन करणाराआहे.
कंत्राटदारांनी शासनाच्या विविध शिर्षाखाली समाधान कारक पूर्ण केलेल्या कामांची थकीत बिले दीर्घ काळापासून अदा करण्यात आलेली नाहीत. सर्व कंत्राटदारांच्या उपजीविकेवर गंभीरपरिणाम झालेले आहेत. परिणामी काही कंत्राटदारांनी आत्महत्तेचा मार्ग स्वीकारला आहे. याशिवाय, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित करून १० लाख पर्यंतची कामे “काम वाटप समिती” मार्फत देण्याचे धोरण आहे.
मजूर सहकारी संस्था, आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांना देण्याची स्पष्ट तरतूद केली आहे. परंतु अनेक कामे एकत्र करून मोठ्या कंत्राटदारांसाठी निविदा काढल्यामुळे छोट्या कंत्राटदारांची उपासमार होत आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग जाणूनबुजून १० लाखांपर्यंतची कामे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तर भंडारा यांचेकडील काम वाटप समितीकडे सादर करत नाहीत, ज्यामुळे शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही व सुशिक्षित बेरोजगार अभियंते तसेच मजूर सहकारी संस्था कामांपासून वंचित राहत आहेत.









