लाखांदूर तालुक्यात वाळू तस्करांना दणका
दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- भंडारा जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल व पोलीस विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने लाखांदूर तालुक्यातील साखरा घाट परिसरात मध्यरात्री धाड टाकून अवैध रेती तस्करी करणारी १ जेसीबी, २ टिप्पर आणि १ ट्रॅक्टरसह सुमारे ७८ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असली, तरी स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमाराससाखरा येथील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू होती.
लाखांदूरचे नायब तहसीलदार दत्ता धकाते यांच्या फिर्यादीवरून, दिघोरी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३० लाखांचा टिप्पर, १२ लाखांचा मिनी टिप्पर, ६.५ लाखांचा ट्रॅक्टर आणि ३० लाखांची जेसीबी असा एकूण ७८.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिघोरी पोलिसांनी या प्रकरणी चेतन शामराव देशमुख, सतीश शंकर आगासे, कमलेश शामराव बावनकुळे, शंकर वामन मटे आणि राकेश धनु साळवे (सर्व रा. दिघोरी) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास हवादार विलास मातेरे करत आहेत.







