शेतकऱ्यांकडे पाटबंधारे विभागाची कोटयावधीची थकबाकी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या व शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या चांदपूर जलाशयाची कोट्यावधी रुपयाची थकबाकी आज सिहोरा व परिसरातील शेतकऱ्यांकडे अडून असल्याचे वृत्त पुढे आले आहे. ही थकबाकी फक्त खरीप धान पिकाची असून रबी (उन्हाळी) धान पिकाच्या थकबाकीचा प्रश्न वेगळा असल्याचे समजते. सदर थकबाकीसाठी चुक कुणाची शेतकऱ्यांची, पाणी वाटप संस्थांची की पाटबंधारे विभागाची असा प्रश्न आज उपस्थित होत आहे.

इंग्रज कालीन चांदपूर जलाशय हा आज ग्रीनवेली चांदपुर म्हणून ओळखला जात आहे. भंडारा जिल्ह्यात हा दुसऱ्या क्रमांकाचा जलाशय असून गोसेखुर्द हा प्रथम क्रमांकात मोडल्या जातो आहे. चांदपुरजलाशय हा १५ ते २० गावच्या शेत शिवारात विस्तारल्या गेला आहे. या जलाशयाला डावे आणि उजवे असे दोन कालवे आहेत. या कालव्याद्वारे चुल्हाड, बपेरा, सिहोरा व येरली जिल्हा परिषद क्षेत्रातील ५२ गावातील शेतकऱ्यांच्या धान पिकाला पाणी पुरविल्या जात आहे.

यात अंदाजे ९ हजार हेक्टर शेती ओलिताखाली असल्याचे वृत्त आहे. चांदपूर जलाशयातील पाणी शेतकऱ्यांच्या धान पिकाला सोडण्यात यावे अशी शेकऱ्याची अपेक्षा वजा ओरड ही नित्याचीच बाब असते. चांदपूर जलाशयात पाणी अपुरे असल्यास सोंड्या टोला उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी वळते करावे अशी ओरड केली जात असते. पाणी सोडण्यात आले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला जातो. परंतु विज बिल, देखभाल व कालवे दुरुस्ती आणी कर्मचारी वर्गाचा खर्च कोणी करावा याचाविचारच केला जात नाही.

हा एक परिसरातील शेतकऱ्यासाठी चर्चेचा विषय होऊन बसला आहे. चांदपुर जलाशय व कालवे हे पाटबंधारे विभागाच्या नियंत्रण व देखरेखीखाली आहेत. प्राप्त माहितीनुसार आज शेतकऱ्यांकडे अंदाजे ६ ते ७ कोटि रुपयाच्या घरात थकबाकी असून दरवर्षाला शेतकऱ्यावर आकारण्यात येणारा पानसारा हा ४० ते ४५ लाख रुपया पर्यंत असल्याचे वृत्त पुढे आले आहे. तर उन्हाळी धान पिकासाठी आकारण्यात येणारा पानसारा हा शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे आकारण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *