गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यासह तिरोडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा दहशतपूर्ण संचार वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे शुक्रवार 9 जानेवारी रोजी बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण तिरोडा तालुक्यातील ग्रामीण परिसरात या बिबट्याची दहशत निर्माण झाली असून एकच खळबळ उडाली आहे.
हियांश शिवशंकर रहांगडाले (वय 4) रा. खडकी (डोंगरगाव) ता. तिरोडा असे मृत चिमुकल्याचे नाव असून, तो आपल्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत चिमुकल्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पसार झाला. सदर बिबट्याने चिमुकल्याला ठार केल्यानंतर जंगलात पसार झाला. या घटनेतील मृतक चिमुकला हियांश शिवशंकर रहांगडाले याचे मृतदेह घरापासून काही अंतरावर गावकऱ्यांना मिळून आले.
काही दिवसांपूर्वी तिरोडा तहसील मधील इंदोरा निमगाव येथे रुची ही तिच्या वडिलांसोबत शेतात गेली होती. दरम्यान रुची देवानंद पारधी (9) या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या मुलीला गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेत मृत मुलीचे वडील शेतात गेले होते आणि त्यांची मुलगी रुची त्यांच्यासोबत शेतात उभी होती.
दरम्यान, बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. रुचीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील आणि जवळच्या शेतात काम करणारे शेतकरी त्यांच्याकडे धावले, त्यानंतर बिबट्या रुचीला सोडून जंगलाकडे पळाला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुचीला गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा पासूनच तिरोड्याच्या इंदोरा निमगाव आणि सुकडी डाकरांम या परिसरात वन्य प्राण्यांची दहशत आहे.









