अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट ठार

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खरबी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक काळवीट गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्युमुखी पडल्याची घटना ४ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यातील तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्ग परिसरात अन्न व पाण्याच्या शोधात हरीण, काळवीट तसेच इतर वन्यप्राणीवारंवार नागरी वस्तीकडे येत आहेत. मात्र या मार्गावरून भरधाव वेगाने धावणारी वाहने वन्यप्राण्यांसाठी जीवघेणी ठरत असून, यापूर्वीही याच परिसरात हरीण ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

वनविभागाच्या कडक कायद्याचा धाक असतानाही अनेक वाहनचालक वन्यप्राण्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. ४ जानेवारी रोजी सकाळी जंगलातून बाहेर पडून गावाकडे जाणाऱ्या एका काळवीटास रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात काळवीट गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस विभागाचे कर्मचारी व वन्यप्रेमींनी तत्काळ काळवीटास तुमसर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच काळवीटाचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाला देण्यातआली. त्यानंतर वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. महामार्गावरील वाहतूक, भटकी श्वाने अथवा अन्य हिंस्र प्राण्यांपासून मृत काळवीटास धोका होऊ नये म्हणून त्यास सुरक्षितरित्या हलविण्यात आले. दरम्यान, वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत काळवीटावर जंगलात विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *