भंडारा व साकोली नगरपरिषद नगराध्यक्ष पदग्रहण आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

 

भंडारा : भंडारा आणि साकोली नगरपरिषदेत नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

भंडारा नगरपरिषदेत भाजपच्या सौ. मधुरा मिलिंद मदनकर यांनी नगराध्यक्षपदाची तर साकोली नगरपरिषदेत देवश्री मनीष कापगते यांनी नगराध्यक्षपदाची शपथ ग्रहण केली. या सोहळ्याला दोन्ही नगरपरिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, भाजप पदाधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले की,
“भंडारा व साकोलीच्या सर्वांगिण विकासासाठी नगरपरिषद, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात परिणामकारक समन्वय आवश्यक आहे. शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सामान्य नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”
पदग्रहणानंतर नगराध्यक्ष सौ. मधुरा मदनकर यांनी भंडारा शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण आणि नागरी सोयींच्या उन्नतीस प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. तर नगराध्यक्ष देवश्री मनीष कापगते यांनी साकोली शहराचा नियोजनबद्ध, सर्वसमावेशक व टिकाऊ विकास साधण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी दोन्ही नगरपरिषदांतील सर्व नगरसेवकांनी पदाची शपथ घेऊन जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा संकल्प केला व एकदिलाने कार्य करण्याची ग्वाही दिली.
पदग्रहण सोहळे शांततेत व उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *