सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण यंत्र बंदच

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील क्षकिरण (एक्स-रे) यंत्र अनेक दिवसांपासून ठप्प आहे. विद्युत दाब जास्त प्रमाणात झाल्यामुळे क्ष-किरण यंत्रमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन क्ष-किरण काढावे लागते. यात त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. जनतेच्या आरोग्य सेवेसाठी शासन मोठमोठे दावे करते. परंतु, तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील वास्तव त्या सर्व घोषणांची पोलखोल करणारे ठरते आहे.

क्ष-किरण यंत्र दुरुस्ती करण्यासाठी कोणतेही तज्ञ कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून आले नाही. त्यामुळे आजही ती मशीन सुरू न झाल्याने रुग्णालयातील एक्स-रे विभाग बंदच आहे. संबंधित कंपनी आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे जनतेला यातून मोठा फटका बसतो आहे. शेकडो रुग्ण एक्स-रे साठी येतात. परंतु, त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. काहींना खासगी दवाखान्यात जावे लागते. तिथे त्यांच्याकडून अधिकचे शुल्क वसुल केले जाते. गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हीपरिस्थिती अधिकच वेदनादायक आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मशीन सुरू करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासन मात्र नेहमीच्या ‘लवकरच सुरू होईल’ अशा उत्तरावरच थांबले आहे. परंतु ही ‘लवकरच’ ची भूमिका अनेक दिवसांपासून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *