१५ लाख अनामत रकमेची अट शिथिल न केल्यास धान खरेदी बंद !

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शासनाचा कोणताही आदेश नसताना धान खरेदी केंद्रधारकांकडून आधी १० लाखांची अनामत आणि ५० लाख रुपयांची बँक गॅरंटी घेण्यात आली. आता पुन्हा १५ लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे पत्र देण्यात आल्याने केंद्रधारकांवर मोठा अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा मार्केटिंग (पणन) कार्यालयाने लागू केलेले १५ लाख रुपयांचे निर्बंध तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा जिल्ह्यात धान खरेदी सुरू न करण्याचा इशारा जिल्ह्यातील धान खरेदी संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला.

जिल्हा पणन कार्यालय जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी करते. याच्यात ‘अ’ व ‘ब’ अशी वर्गवारी केली आहे. यात २०१९ पूर्वी “अ’ वर्गातील खरेदी केंद्रातून धानाची खरेदी व्हायची. मात्र, संपूर्ण जिल्ह्याला खरेदी करताना खूप मोठ्या समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. शेतकऱ्यांना समर्पक खरेदीची सेवा मिळावी, या उदात्त हेतूने जिल्ह्यात “ब’ दर्जाच्या खरेदी केंद्रांना नियमानुसार खरेदीची परवानगी देण्यात आली.

“ब’ दर्जाच्या खरेदी केंद्रधारकांनी गतवर्षीपर्यंतव्यवस्थित धान खरेदी करीत शेतकऱ्यांना व पणन कार्यालयाला सुद्धा सेवा पुरविली. मात्र दिवसेंदिवस जिल्हा मार्केटिंगफेडरेशनचा ब दर्जाच्या धान खरेदी केंद्रांना नाहक त्रास वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील २३७ केंद्र धारक एकवटले. सोमवारला एकत्रित बैठक घेत जिल्हाधिकारी महोदय व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन १५ लाख रुपयांची अट शिथिल करण्याची मागणी केली. जोपर्यंत ही अट मागे घेतली जाणार नाही, तोपर्यंत जिल्ह्यात धान खरेदी होणार नसल्याचा थेट इशारा जिल्हा धान खरेदी संघ भंडारा यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *