नाशिकचा पालकमंत्री का नेमला जात नाही? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल, तपोवनातील झाडांच्या कत्तलीवरही रोखठोक भाष्य
नाशिकः- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला शिंदे गटातील नेत्यांकडून विरोध झाल्यामुळे अवघ्या एका दिवसातच नाशिकच्या पालकमंत्रिपदाची घोषणा स्थगित करण्यात आली. यानंतर अद्याप महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. तर नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.
या कुंभमेळ्यात साधूमहंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात ११५० एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे म्हणाले की, नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होत आहे. कुंभमेळा व्हायला पाहिजे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून कुंभमेळा होत आहे.
गेल्यावेळी देखील तिथे कुंभमेळा झाला होता. तिथे येणारे हजारोलाखो साधू संत आणि भाविकांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी सुविधा पुरवण्याचे काम हे सरकारचे आहे. दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडले, चेंगराचेंगरीमध्ये किती भाविक भाविकांचा जीव गेला? त्याचा नेमका आकडा अजून आलेला नाही. भाविकांना सोयी सुविधा देण्याचे काम सरकारचे असल्याने त्यातपारदर्शकपणा असला पाहिजे. २८ नोव्हेंबर रोजी देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाही हे एक कोड आहे. त्या कोड्याचे उत्तर कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चात आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.









