साकोली? भाऊ-तिकीट संभ्रमाने निवडणूक रंगली!
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सकाळपासूनच शहरात अफवांचे वादळ उसळले होते. भाऊ तिकीट झाली का? की कटली? अशा चर्चांनी राजकीय वातावरण तापविले. दुपारी तीनपूर्वी प्रमुख पक्षांकडून एबी फॉर्म मिळताच अनेकांच्या उमेदवारीची स्वप्ने क्षणात धुळीस मिळाली. तिकीट न मिळाल्याचा संताप अनावर झालेल्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून पक्षश्रेष्ठींना स्पष्ट संदेश दिला. आम्हीही मैदानात आहोत!
अंतिम दिवस खऱ्या अर्थाने राजकीय नाट्यमयतेने भरलेला ठरला. काँग्रेसने दीर्घ प्रतीक्षेनंतर शेवटच्या क्षणी “सुरीळीश मूव्ह’ खेळत माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनीता कापगते यांना नगराध्यक्ष पदाचे तिकीट देत प्रभावी शक्तीप्रदर्शन केले. भाजपने आधीच आपली दिशा स्पष्ट करत माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांची सून व माजी नगरसेवकाची पत्नी सौ. देवश्री मनीष कापगते यांचे नामांकन १६ नोव्हेंबर रोजी दाखल करून मैदान गाजवले. राष्ट्रवादी (अप) गटाने भारती मोहन लंजे यांना उमेदवार घोषित करत बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढत शक्ती दाखवली. शिवसेना शिंदे गटानेही स्वतंत्र समीकरण मांडत वंदना गुलाब पोहाणे यांचे अर्ज आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत दाखल करून स्पर्धेला चौकोनी वळण दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीने कोकिला रामटेके यांना अधिकृत उमेदवार देत स्वतंत्र अस्तित्व दाखविले. या सर्व प्रमुख पक्षांच्या सक्रिय रणनितींमुळे साकोलीसेंदुरवाफाची निवडणूक तुफान टक्कर आणि अनपेक्षित वळणांनी भरलेल्या रोमांचक शर्यतीकडे झेपावली आहे. अंतिम दिवशीच नगराध्यक्ष पदासाठी तब्बल ९ तर नगरसेवक पदासाठी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी एकूण १६ अर्ज आणि नगरसेवक पदासाठी तब्बल १७१ अर्ज दाखल झाले आहेत. या भव्य अर्जसंख्येमुळे प्रत्येक प्रभागात बहुकोनी लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून बंडखोरांची फौज समीकरणे ढवळून काढण्याच्या तयारीत आहे. साकोलीची ही निवडणूक आता नावाजलेल्या पक्षांच्या प्रतिष्ठेची, बंडखोरांच्या ताकदीची आणि मतदारांच्या निर्णयशक्तीची खरी कसोटी ठरणार आहे.
उमेदवारी परत घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतरच साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तिकीट वाटपातील गोंधळ, बंडखोरीची लाट आणि अपक्ष उमेदवारांच्या मोठ्या संख्येमुळे सध्या समीकरणे पूर्णपणे गुंतागुंतीची झालेली आहेत. कोण माघार घेणार आणि कोण शेवटपर्यंत रिंगणात राहणार यावरच प्रभागनिहाय लढतीचे स्वरूप ठरणार आहे. त्यामुळे अंतिम तारीख संपेपर्यंत सर्वांचे लक्ष “अंतिम यादी’ कडे खिळून राहणार आहे.









