तरुणांकडून साडेपाच किलो गांजा केला जप्त;दुचाकीवरुन करीत होते वाहतूक

गोंदिया :- दुचाकीने गांजा विक्रीसाठी नेत असताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत रेलटोली परिसरातील हनुमान मंदिराजवळ बुधवार १२ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून पाच किलो ६० ग्राम गांजा व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दोन तरुण दुचाकीने विक्रीसाठी गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने रेलटोली परिसरातील हनुमान मंदिराजवळ सापळा लावला होता. दरम्यान, दोन तरुण दुचाकी जात असताना त्यांना थांबवून पथकाने विचारपूस केली असता त्यांनी दीपक गणपत बांशकर(२१, रा. तिल्वाराघाट, जबलपूर-मध्य प्रदेश) व गौरीशंकर प्रकाश चाचिरे (२४, रा. तुमसर, भंडारा) अशी नावे सांगितली. पथकाने यातील दीपक बांशकर याच्याकडील स्कूल बॅगची पाहणी केली असता त्यात सेलो टेपने गुंडाळलेले एक बंडल ज्यात ४० हजार रुपये किंमतीचा दोन किलो ५० ग्राम ओलसर पाने, फुले व बिया मिश्रित गांजा मिळून आला, तर गौरीशंकर चाचिरे याच्या बॅगमध्ये पांढऱ्या रंगाच्या पॉलिथीनमध्ये ६० हजार रुपये किंमतीचा तीन किलो १० ग्रॅम ओलसर पाने, फुले, बिया मिश्रित गांजा मिळून आला. पथकाने एक लाख रुपये किंमतीचा गांदा तसेच दोघांचे ३५ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एक लाख ३५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *