“त्या’ महिलेवर तणावग्रस्त वातावरणात अंत्यसंस्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून वनविभागाचे वाहन पेटवून दिले. वनविभागाचे वाहन जळल्याप्रकरणी पोलिसांनी गावातील ९ पुरुषांना ताब्यात घेतले. त्यामुळे अधिकच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी जोवर गावातील पुरुषांना पोलीस सोडणार नाहीत तोवर महिलेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. अखेर वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तणावग्रस्त वातावरण कवलेवाडा येथे आज गुरुवारला सायंकाळी महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा वन परिक्षेत्र अंतर्गत कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर भागात बुधवारी दि. २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान शेतात काम करीत असलेल्या नंदा किसन खंडाते (५०) रा. कवलेवाडा या महिलेवर हल्ला करून वाघाने तिची शिकार केली.

एवढेच नाही तर तब्बल सहा तास वाघ या महिलेच्या मृतदेहाजवळ बसून होता. वन विभागाला माहिती देण्यात आली, पण अधिकारी, कर्मचारी लवकर न पोहचल्याने ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले होते. त्यामुळे वन विभागाची चमू घटनास्थळी पोहचल्यावर संतप्त गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. शिवाय वाहनही जाळले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांना क्षमविताना वनविभागाची आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. दरम्यान वनविभागाने वाघाला बेशुद्ध करून ताब्यात घेतले. दरम्यान यावेळी ज्या पिंजऱ्यात वाघाला ठेवण्यात आले, त्या पिंजऱ्यासमोर महिलेचा मृतदेह ठेवून महिलेच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत करावी आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. अखेर रात्री उशिरा पोलिस आणि वनविभागाने नागरिकांचीसमजूत काढून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. तर ९ जणांना अटक केली.

याची माहिती गावात होताच शेकडो गावकऱ्यांनीरुग्णालयाकडे धाव घेतली. अटक करण्यात आलेल्यांना जोतपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी मांडली. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मनधरणी केल्यानंतर आज महिलेचा मृतदेह गावात आणण्यात आला. त्यावेळी सुद्धा गावकऱ्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी नकार दिला. गावकरी, पोलीस आणि वन विभाग यांच्यात संघर्ष स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. शेवटी सायंकाळी महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *