खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या शहरातील दौऱ्यानंतर नगर परीषद लागली कामाला

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील रस्त्यांची खराब अवस्था, नाले सफाई, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींवर तातडीने लक्ष देत, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी उन्हामध्ये शहराचा प्रत्यक्ष दौरा केला होता. खासदारांच्या सूचनेनंतर नगरपरिषदेने तत्काळ हालचाल सुरू केली असून, रस्त्यांच्या डागडुजीचे काम दिसून येत आहे तर नाले सफाई व कचरा व्यवस्थापन यासाठी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.

खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव जिया पटेल, माजी नगरसेवक शमीम शेख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा जयश्री बोरकर, धनराज साठवणे, पवन वंजारी, पृथ्वी तांडेकर, गजानन बादशाह, विनीत देशपांडे, सचिन फाले, कमल साठवणे,जुनेद भाई, गोपाल डोकरीमारे व काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत विविध भागांना भेटी देऊन समस्यांचा आढावा घेतला. प्रत्यक्ष पाहणीत उघडे नाले, कचऱ्याने भरलेली गटारे, खड्डेपडलेले रस्ते आणि पाणीपुरवठ्यातील विस्कळीतपणा यांकडे त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

खासदारांच्या निर्देशानंतर नगरपरिषदेने हालचाल सुरू केली आहे. सध्या शहरातील आंबेडकर वॉर्ड,कुंभार टोली, चांदणी चौक, लायब्ररी चौक व शहरातील अन्य भागांमध्ये रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू आहे. नाले सफाई आणि कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *