बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड:- मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे गुन्हेगारीचा हॉटस्पॉट अशी ख्याती झालेल्या बीड जिल्ह्यात गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी सात वाजताच परळीत दाखल झाले. यानंतर अजितदादांनी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यानंतर अजित पवार हे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पोहोचले. या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु, धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते. अजित पवार यांच्यासोबत उजव्या बाजूला दोन मंत्री म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बसले होते. त्यांच्या बाजूला खासदार रजनी पाटील आणि बजरंग सोनवणे हे बसले होते. तर समोरच्या बाजूला सगळे आमदार म्हणजे सुरेश धस, त्यानंतर नमिता मुंदडा, त्यासोबतच विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके समोर बसल्याचे आपल्याला दिसत होते.
अजित पवार यांनी बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान आवास योजनेची माहितीघेतली. या बैठकीत अजित पवार यांनी जिल्ह्यातील चुकीच्या कामाची चौकशी होणार, असे सांगितले. तसेच नियोजन आराखड्याबाहेरची आतिरिक्त कामांना आतिरिक्त कामे कशी काय मंजूर केली, असा सवाल अजितदादांनी अधिकाऱ्यांना विचारला. यापुढे जिल्ह्यातील विकासकामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.