तुमसर बसस्थानकात सुविधांबाबत तपासणी
सर्व उपस्थित सदस्यांनी बस स्थानकाचे सखोल पाहणी करत विविध उपक्रमांची अंमलबजावणी आणि त्यांच्या दर्जाची पडताळणी केली. सर्वेक्षण समितीने बस स्थानकावर करण्यात आलेल्या रंगरंगोटी, भिंती चित्राचे चित्रीकरण, सौंदर्यीकरणासाठी तयार करण्यात आलेला बगीचा, सेल्फी पॉईंट, अनाउन्सिंग सिस्टीम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रवाशांसाठी उपलब्ध घड्याळ, स्वच्छतागृहे यासारख्या मूलभूत व अद्यावत सुविधांची तपासणी केली. यासोबतच प्रवाशांना दिला जाणाऱ्या सेवा- सुविधा, स्थानकाचे स्वच्छता, व्यवस्थापन पद्धती, कर्मचारी वर्तनशैली यांचा देखील आढावा घेतला. समितीने स्थानकाच्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत सर्व माहिती गोळा केली आणि स्थानकांच्या गुणवत्तेचे गुणांकन केले.
यामध्ये प्रवासी सुविधांचा दर्जा, स्थानकांचा देखणा व स्वच्छ देखावा, माहिती फलकांची उपस्थिती, सीसीटीव्ही देखरेख प्रणाली यासारख्या बाबींचा समावेश होता. यावेळी बोलताना समिती सदस्यांनी तुमसर बस स्थानकात झालेल्या सकारात्मक बदलांची प्रशंसा केली. स्थानकाच्या स्वच्छतेबाबत व प्रवासांना दिल्या जाणाऱ्या सुविधा समाधानकारक असल्याचे नमूद करत काही सुधारणा सुचविण्यात आल्या. येत्या काळात या सूचनांवर आधारित सुधारणा करण्यात आल्यास तुमसर बस स्थानक राज्यातील आदर्श स्थानकामध्ये गणले जाईल असे मत समितीने व्यक्त केले. प्राचार्य राहुल डोंगरे पत्रकार यांनी चालक – वाहक व कर्मचारीवृंद यांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी व कौशल्य पूर्ण काम करण्यासाठी समुपदेशन कार्यशाळाचे आयोजन करावे असे यावेळी मत व्यक्त केले, हे विशेष.